जळगाव : कोरोनाबाधित रुग्णांना वरदान ठरणारा प्लाझ्मा दान करण्यासाठी जळगावातील महावितरणच्या अभियंत्याने पुढाकार घेतला आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणचे अभियंता भूषण तेलंग यांनी कोरोनाबाधित रुग्णासाठी गुरुवारी (29 एप्रिल) आपला प्लाझ्मा दान केला.
भूषण तेलंग हे महावितरणच्या जळगाव विभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त व्यक्तीचा प्लाझ्मा इतर कोरोनाबाधित रुग्णाचा जीव वाचवू शकतो, हे तेलंग यांना माहीत झाल्यावर त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत तेलंग यांनी प्लाझ्मा दान केला. यावेळी महावितरणच्या जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी, जळगाव रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, मानद सचिव विनोद बियाणी. रक्तपेढीप्रमुख डॉ.प्रसन्न रेदासनी यांच्यासह सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, मंडल सचिव देवेंद्र भंगाळे, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे (जिंदा) मानद सचिव सचिन चोरडीया आदी उपस्थित होते .
जळगाव जिल्ह्यात प्रथमच महावितरणच्या अभियंत्याने कोरोनाबाधित रुग्णासाठी आपला प्लाझ्मा दान केला आहे. त्यामुळे रुग्णाचा प्राण वाचू शकतो. या उपक्रमाबद्दल अभियंता भूषण तेलंग यांचे सर्वत्र कौतुक होत असून, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जास्तीत जास्त कोरोनामुक्त व्यक्तींनी कोरोनाबाधित रुग्णाच्या उपचारासाठी आपला प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने केले आहे.