जळगाव – जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोविड विषाणू संक्रमित नागरिकांचा शोध घेऊन त्यांचेवर जिल्हा आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमित नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटन, जळगाव यांच्या स्वयंसेवकांचा सहभाग असलेला “कोविड संक्रमित नागरिक शोध मोहीम कक्ष” स्थापन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.
कोविड संक्रमित नागरिकांच्या शोध मोहिम कक्षात 7620170659 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यरत राहणार आहे. या मोबाईल क्रमांकावर जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिसरात आढळणारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिकांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती पाठवावी. जे नागरिक अशा संक्रमित रुग्णांची माहिती पाठवतील त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या मोबाईल क्रमांकावर येणारे कोणतेही इन्कमिंग कॉल स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर केवळ व्हॉट्सअप अथवा एसएमएस द्वारे कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/ वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक असल्यास तो पाठवावा. कोविड विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची माहिती, व्हिडिओ, अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास अशा प्राप्त मोबाईल क्रमांक धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सुजाण व जागृत नागरिकांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आपल्या परिसरातील विषाणू संक्रमित नागरिक/कोविड व्हायरस स्प्रेडर्स/वाहक नागरिक यांचे नाव पत्ता व उपलब्ध असल्यास मोबाईल क्रमांक आदि माहिती प्रशासनास देऊन विषाणूचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.