दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक ‘,’मसान’,’संजू’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन विकीने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा मिळवली. त्यामुळेच आज त्याचा मोठा फॅनफॉलोअर्स असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे विकी कुठेही दिसला तरी चाहते त्याच्या आवतीभोवती घोळका करत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच सध्या विकी आणि त्याच्या एका चाहतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकीसोबत सेल्फी घेण्यासाठी एक चाहती हट्टाला पेटल्याचं दिसून येत आहे.
विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर विकी आणि या चाहतीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विकीला पाहिल्यानंतर त्याची एक चाहती धावत येऊन त्याच्यासोबत फोटो काढते. मात्र, फोटो काढल्यानंतर तो मोबाईलमध्ये सेव्ह न झाल्यामुळे पुन्हा विकीजवळ येऊन पुन्हा एक नवीन फोटो काढण्याचा हट्ट करते असं दिसून येत आहे.
दरम्यान, विकीदेखील या चाहतीचं मन राखण्यासाठी पुन्हा एकदा तिच्यासोबत फोटो काढतो. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विकी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तो त्याचे वर्कआऊट किंवा चित्रपटासंदर्भातील पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.