फैजपूर प्रतिनिधी: गेल्या वर्षभरापासून कोरोना या भीषण आजाराने संपुर्ण जगात थैमान घातले आहे.यामधे लाखो लोकांचे जीव गेले असुन या आजारात फैजपूर शहरातील देखील अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.या भयंकर आजारांपासून बचावासाठी केंद्र सरकारने महत्वकांक्षी कोविड लसिकरण मोहीम हाती घेतली असून ग्रामीण तसेच शहरी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात ही लसिकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.
अपवाद आहे तो फक्त फैजपूर शहराचा.म्हणून लवकरात लवकर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नारिशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी आ.शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे केली आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या फैजपूर शहरात मात्र अजुनपर्यंत शासकीय लसिकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.शहराच्या लोकसंख्येचा विचार करता विविध आजाराने ग्रस्त असलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधव यांना शहरात लसिकरणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खुप शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून शहरापासून लांब असलेल्या इतर गावांतील प्रा.आ.केंद्रावर लस घेण्यासाठी जावं लागतं आहे.त्यातच शासनाने साथरोग नियंत्रण कायद्यान्वये घराबाहेर पडण्यास कडक निर्बंध लागू केले असल्याने खासगी प्रवासी वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.म्हणून फैजपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक,आजारी व दिव्यांग नागरिक तसेच महिलांना लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे.
कदाचित संपुर्ण राज्यात फैजपूर हे एकमेव असे शहर असेल कि जिथे अजुनपर्यंत शासकीय कोवीड लसिकरण केंद्र सुरू झालेले नाही. या दृष्टीने लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाहीत तर भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणावर फैजपूर शहरात रुग्णसंख्या वाढून मोठं संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे आजार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भिती असून तत्काळ दखल घेऊन स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात पाठपुरावा करुन फैजपूर शहरातील नागरिकांसाठी युद्धपातळीवर शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केली आहे.