जळगाव- जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असतांना, मागील दोन ते तीन महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेचे सफाई व फवारणी कर्मचारी दिसेनासे झालेले आहेत. असा प्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी उपस्थित केला तसेच महानगरपालिका आरोग्याधिकारी,मुकादम यांना तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.
महानगरपालिका येथे सद्यस्थितीमध्ये 34 फवारणी कर्मचारी आहेत. काही कर्मचारी कोविंड सेंटर व शासकीय कार्यालय येथे सेवा देत असतील तरी उर्वरित कर्मचारी हे जळगाव शहरामध्ये फवारणी व साफसफाई चे काम करण्यासाठी वार्डात येत नाही. त्यांच्याकडून योग्य रीतीने काम करून घ्यायची जबाबदारी मनपा अधिकाऱ्यांची व सत्ताधारी महापौर-उपमहापौर व पदाधिकार्यांची आहे. प्रत्येक वार्डात फवारणी केली तर डेंगू , मलेरिया, टॉयफाईड सारखे आजार व इतर आजारां पासून जळगाव शहरातील जनतेचे रक्षण होईल. आजच्या स्थितीत सर्व जण कोरोना सारख्या विषाणू जन्य आजाराच्या विळख्यात आहेत. महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला असून त्याचे जनता पालन करीत आहे. जर शहरात साफसफाई होत नसेल तर अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळेल.
शहरात सफाई कर्मचारी यांनी कचरा न उचलल्याने कचराकुंड्या भरलेल्या आहेत. गटरी तुंबून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे.सफाई कर्मचारी काम करत नाहीत त्याच्याकडे लक्ष देणार कोण? रोजंदारी कर्मचारी किती व कायम कर्मचारी किती?याचा मनपा कडे काहीही ताळमेळ नाही.
सफाई कर्मचाऱ्यांना व फवारणी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने युनिफॉर्म दिले पाहिजे. ज्याने लोकांना कळेल की नगरपालिका चा पर्मनंट कर्मचारी कोण आहे व रोजंदारी (ठेकेदाराचा) कर्मचारी कोण आहे आणि दोघांना वेगळ्या रंगाचा युनिफॉर्म द्यायला पाहिजे जेणेकरून लक्षात येईल की, रोजंदारी मजूर किती काम करता आणि कायम कर्मचारी किती काम करत आहेत.
मागील अडिच वर्ष मनपा वर बीजेपी ची सत्ता होती. त्याकाळात देखील शहरात घाणीचे साम्राज्य होते .नवीन महापौर-उपमहापौर यांनी शहरात प्रत्येक वार्ड मध्ये स्ट्रीट लाईट,रस्ता दुरुस्ती, पाणी,साफसफाई सारख्या प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शासकीय रुग्णालये आता कोविड सेंटर झाल्याने लोकांना मलेरिया, टॉयफाईड सारख्या आजाराकरिता खर्चाची ऐपत बऱ्याच लोकांकडे नसल्याने तरी यापुढे मनपा ने लोकांच्या आरोग्याकडे व शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.