जळगाव – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची बेड मिळविण्यासाठी होणारी धावपळ थांबावी, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने बेड व्यवस्थापन संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आतापावेतो या संपर्क कक्षास जिल्ह्यातील 1 हजार 75 व्यक्तींनी संपर्क साधल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.
कोरोना बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, उपचारासाठी त्यांची धावपळ होवू नये, ज्या रुग्णालयात बेड शिल्लक आहे त्या रुग्णालयात रुग्णास तातडीने दाखल करता यावे, याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने बेड व्यवस्थापन संपर्क कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात जिल्ह्यातील सर्व कोविड उपचार करणाऱ्या रुग्णांलयांची तालुकानिहाय यादी, प्रत्येक रुग्णालयातील एकूण बेड, त्यापैकी ऑक्सिजन बेड, आयसीयु बेडची संख्या, सध्या रिक्त असलेल्या बेडची संख्या आदि उपलब्ध आहे. याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील यांच्या नियंत्रणात यंत्रणा काम करीत आहे.
या संपर्क कक्षास 15 एप्रिल रोजी दु. 1.00 वाजेपावेतो जिल्ह्यातून एकुण 24 व्यक्तींनी संपर्क साधला असून त्यांना तालुकानिहाय ऊपलब्ध बेड व रुग्णालयांची माहिती व तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. तर संपर्क कक्ष सुरु झाल्यापासून 15 एप्रिलपावेतो एकुण 1 हजार 75 व्यक्तींनी संपर्क साधला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.