जळगाव – बोगस बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. पावसाळी सोयाबीन नंतर आता हायटेक कंपनीच्या ज्वारी चे बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे.
भडगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी योगेश अशोक पाटील यांनी उन्हाळी ज्वारीचे बियाणे खरेदी केले. बियाणे हायटेक कंपनीचे होते .स्थानिक विक्रेत्याकडून बियाणे विकत घेतल्याची रितसर पावती त्यांच्याकडे आहे. सुमारे सात एकरामध्ये योगेश अशोक पाटील या शेतकऱ्याने उन्हाळी ज्वारीची पेरणी केली. पूर्ण चार साडेचार महिन्याचा कालखंड लोटला मात्र ज्वारीच्या कंणसामध्ये दाणे भरलेच नाही. पूर्णपणे बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्याने बियाणे विक्रेत्यास सांगितले मात्र त्याने शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता कंपनीने जे बियाणे दिले तेच विक्री केल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर दिले.
शेतकऱ्याने ‘कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली. संबंधित शेतकऱ्याने पाच महिने रात्रंदिवस शेतात राबून काबाडकष्ट करून पिक उभे केले. मात्र बोगस बियाण्यांमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मोठ्या उमेदीने जलसिंचनाची सुविधा, मशागत, खते ज्वारी पिकाला उपलब्ध करून दिले. मात्र हायटेक कंपनीच्या बोगस बियापासून शेवटी उत्पन्न मात्र निघालेच नाही. त्यामुळे संबंधित कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी योगेश अशोक पाटील या शेतकऱ्याने केली आहे.