नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सोने आणि चांदीचे दर सध्या बऱ्याच कमी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराबरोबर भारतीय सराफात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात आज सोन्याचे दर 881 रुपयांनी वाढून 44,701 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 1,071 रुपयांनी वाढून 63,256 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,719 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर वाढून 24.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर आले.
अजूनही भारतामध्ये सोन्याचे दर तुलनेने बरेच कमी आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार आगामी काळात खरेदी वाढविण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यानंतर दीर्घ पल्ल्यात सोन्याची खरेदी फायदेशीर ठरू शकते असे काही विश्लेषकांना वाटते.
काही महिन्यापूर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते मात्र नंतर आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट झालेली आहे. त्यामुळे लग्नासाठी सोन्याची खरेदी करणाऱ्यांना सध्याचा काळ योग्य समजला जात आहे.