जळगाव – जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यांनी जळगाव शहर मतदार संघात मतदार नोंदणी केली असल्याने त्यांना निवडणूक ओळखपत्राचे (EPIC) वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी पदाचे कर्तव्य बजावत असतांना मतदार म्हणून कर्तव्य बजावणेसाठी मतदार नोंदणी करुन घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. वयाची 18 वर्षे पुर्ण झालेल्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांनी त्वरीत मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याप्रसंगी केले,
सद्यःस्थितीत मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रीया सुरु असुन या प्रक्रीयेत नमुना क्र. ६ भरुन मतदार नोंदणी, नमुना क्र. 7 भरुन मतदार वगळणी आणि नमुना क्र. 8 भरुन मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, तसेच नमुना क्र. ८- अ भरुन त्याच विधानसभा मतदारसंघात स्थानांतरण करता येते,
सध्या बी.एल.ओ मार्फत मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे घरोघरी जाऊन फोटो संकलित करणेत येत आहेत. जेणेकरुन 100 % फोटो असलेली मतदार यादी तयार करता येणार आहे. तरी ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, अशांनी त्वरीत आपले फोटो संबंधित बी.एल.ओ किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. अनुराधा यांनी मतदार नोंदणीत स्त्रियांनी देखील पुढे यावे आणि मतदार म्हणून नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार स्त्री- पुरुष प्रमाण 922 असुन मतदार यादीनुसार स्त्री-पुरुष प्रमाण 921 इतके आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी अद्याप ज्या महिलांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.