देशाची एकूण गरज विचारात घेऊन ६० ते ६५ टक्के खाद्यतेल परदेशातून आयात करावे लागते. खाद्यतेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यानंतर खाद्यतेलांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यातच तेल आयात होणाऱ्या देशांतील वातावरणातील बदलांमुळे तेलबियांच्या उत्पादनात घट झाली. करोनामुळे परदेशात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. त्याचप्रमाणे तेलआयातीसाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चात वाढ झाली. सागरी मार्गाने वाहतूक करणारे कंटेनर उपलब्ध न झाल्याने परदेशातून होणारी खाद्यतेलाची आयात कमी झाली तसेच दरात मोठी वाढ झाली, अशी माहिती पुणे मार्केटयार्डातील खाद्यतेलांचे व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.
खाद्यतेलांच्या आयातीवर भारत अवलंबून आहे. पेट्रोलनंतर सर्वाधिक आयात खाद्यतेलांची केली जाते. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने दोन वेळा खाद्यतेलावरील आयातशुल्कात (इम्पोर्ट ड्युटी) वाढ केली. आयात शुल्कवाढीनंतर परदेशातील खाद्यतेल उत्पादकांनी दरात वाढ केली. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यतेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे.
जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असलेल्या भारतात दरवर्षाला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. आपल्या देशाची गरज २२५ लाख टन आहे. भारतात फक्त ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होते.
थोडी माहिती… मलेशिया, इंडोनिशेया या दोन देशात पामतेलाचे उत्पादन घेतले जाते. ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका या देशातून सोयाबीन तेलाची आवक होते तसेच रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. या देशात तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
खाद्यतेलांचे दर (१५ किलो डबा)
खाद्यतेल प्रकार मार्च २०२१ मधील मार्च २०२० मधील
शेंगदाणा २५५० ते २६५० रुपये १६०० ते १७०० रुपये
रिफाईंड शेंगदाणा २४०० ते ३००० रुपये १८०० ते २३०० रुपये
सोयाबीन २००० ते २१०० रुपये १२०० ते १३०० रुपये
सरकी तेल २००० ते २१०० रुपये १२०० ते १३०० रुपये
सूर्यफूल २४०० ते २५०० रुपये १२०० ते १३०० रुपये