जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाने मोठा धक्का बसविलेला आहे. आज जिल्ह्यात १२२३ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून यामध्ये चोपडा तालुक्यात सर्वात जास्त पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे दिसून आले आहे.
जळगाव शहर-२४८, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-१३५, अमळनेर-१५३, चोपडा-३३८, पाचोरा-३, भडगाव-३०, धरणगाव-३१, यावल-४५, एरंडोल-२९, जामनेर-६५, रावेर-१९, पारोळा-३४, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-२९, बोदवड-२७ आणि इतर जिल्हा-१ असे एकुण १ हजार २२३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजवर एकुण ८० हजार ७८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६८ हजार ९८१ जण कोरानामुक्त झाली आहेत. तर १० हजार २७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यातून तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधित सहा रूग्ण जळगाव शहरातील आहे. आत्तापर्यंत १ हजार ५२६ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोना आता धोक्याच्या पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने चोपडा तालुक्यात संसर्गाचा धोका जास्त असल्याचे आज देखील आढळून आले आहे. या तालुक्यात आज दिवसभरात तब्बल ३३८ इतके रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. जळगाव शहर वगळता तालुका पातळीवर इतके रूग्ण एकाच दिवशी आढळून आलेले नाहीत. यामुळे येथील प्रशाासनावर ताण वाढणार आहे.
याच्या खालोखाल आज देखील जळगाव शहरातील संसर्ग कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे. शहरातील कान्याकोपर्यात रूग्णसंख्या असल्याचे आजच्याही आकडेवारीतून दिसून आले आहे. मध्यंतरी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. मात्र अजून देखील कोरोनाची साखळी तुटली नसून पेशंटची संख्या सातत्याने वाढीस लागल्याच स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. काल ८७१३ रूग्णांची कोविड चाचणी करण्यात आली. यातून १२२३ इतके बाधीत आढळून आले आहेत. यामुळे रूग्ण आढळण्याचा दर हा ७.१२ टक्के इतके टक्के झालेला आहे. तर गेल्या आठवड्यात २.९७ टक्के असणारा मृत्यूदर हा गेल्या २४ तासांमध्ये १.८९ टक्के असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोविड-१९ रूग्णांचे निदान करण्यासाठी आजपासूनच मोहिम सुरू केलेली आहे. यात कॉन्टॅक्ट ट्रेसींगच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.