जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २२ मार्च रोजी भेट देत आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना व्यवस्थापनविषयी माहिती जाणून घेतली. कोरोना व्यवस्थापनविषयी अडचणी समजून घेत जिल्हाधिकारी राऊत यांनी विविध सूचना केल्या.
यावेळी बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अरुण कसोटे, रुग्णालयाचे नोडल अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी किरण सावंत पाटील उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील कोरोना रुग्ण व्यवस्थापनाविषयी डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. रुग्णालयातील अडचणी समजून घेत सूचना केल्या. कोरोना बाधित आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले डॉक्टर्स, परिचारिका रुजू होतील तसा मनुष्यबळाचा प्रश्न मिटणार आहे. तसेच ५० बेड साईड असिस्टंट रुग्णांच्या सेवेसाठी नेमले जाणार आहे.
रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित झाला आहे. त्यासाठी आता पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत जिल्हाधिकारी देणार असून लवकरच कोविड रुग्णालयात सुरक्षेसाठी पोलीस दिले जाणार आहे. यासह खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती, वॉर रूम सोमवारी २२ मार्च रोजी गठीत करण्यात आली आहे. यात रुग्णांना खाटा मिळतील का, रुग्ण-नातेवाईक संवाद घडवून आणणे, नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणे हे काम केले जाणार आहे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येणार आहे. हा वॉर रूम जनसंपर्क कक्ष येथे मंगळवारी २३ पासून कार्यान्वित करण्यात येत असून या वॉर रूमची देखील पाहणी नोडल अधिकाऱ्यांनी केली.
बैठकीवेळी कृषी अधिकारी अनिल भोकरे, डॉ. संदीप पटेल, डॉ. इम्रान तेली, अधिसेवीका कविता नेतकर उपस्थित होते.