मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असे स्पष्ट केले आहे. कोरोनाबाधित उमेदवारांनाही ही परीक्षा देता येणार आहे. त्याला परीक्षेसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली जाणार असून पीपीई किटही दिले जाईल असे आयोगाने म्हटले आहे.
एमपीएससीची पूर्वपरीक्षा येत्या 21 मार्च रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे 27 मार्च आणि 11 एप्रिल रोजी होणाऱया परीक्षाही पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार आहेत. पूर्वपरीक्षा 14 मार्च रोजी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
त्याची दखल घेत 21 मार्च ही नवी तारीख जाहीर करण्यात आली.
आयोगाने परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावलीही पुढीलप्रमाणे जाहीर केली आहे .
विद्यार्थ्यांना तीन पदरी कापडाचा मास्क बंधनकारक.
उमेदवारांना परीक्षा केंद्रात कोरोना किट पुरवणार.
परीक्षेवेळी हात सातत्याने सॅनिटाइज करणे आवश्यक.
परीक्षा केंद्रात येताना आणि जाताना सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक.
कोरोनाची लक्षणे आढळलेल्या तसेच कोरोनाबाधित उमेदवारांना पीपीई किटसह आवश्यक वस्तू पुरवणार.