जळगाव प्रतिनिधी । पिस्तूलचा धाक दाखवुन पैसे लुटणाऱ्या तिसऱ्या संशयिताच्या आज रोजी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून 20 लाख 61 हजाराची रोकड जप्त केली आहे.
धुळे येथील दगडीचाळ येथे राहणाऱ्या अविनाश सुरेश माने (वय १९ ) असे अटक केलेल्या तीसऱ्या संशयिताचे नाव आहे. तर या आधी खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. खुशाल व रितीक या दोघांनी १ मार्च रोजी जळगाव शहरात महेश भावसार यांना अडवुन त्यांच्या ताब्यातील १५ लाख रुपयांची रोकड लांबवली होती. यानंतर दोघे धुळे, सुरत व उल्हासनगर येथे पळुन गेले होते. या दरम्यान, पोलिसांनी उल्हासनगर येथुन दोघांना ताब्यात घेतले. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, या तीघांनी आत्तापर्यंत लोकांकडून लुटलेल्या रकमेपैकी २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.