जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणारा कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झाला नसल्याचे आजच्या अहवालातून दिसून आले आहे. आज जिल्हाभरात तब्बल ६१० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहरांमधील लागोपाठ दुसऱ्या दिवशी तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. अलीकडचा विचार केला असता जळगाव शहर, चोपडा आदी तालुक्यांमध्ये पेशंटची संख्या सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. मात्र आजची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जळगाव शहरातील प्रचंड रूग्णसंख्या होय. आज तब्बल ३३४ कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
जळगाव शहराच्या कान्याकोपर्यात कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याचे अधोरेखीत झाले आहे. एकीकडे कोरोनाचे लसीकरण सुरू असतांना दुसरीकडे प्रचंड प्रमाणात आढळून आलेले रूग्ण हा आरोग्य यंत्रणांना चिंतेचा विषय आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार गत चोवीस तासांमध्ये ६१० नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३२७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या कोरोना बळींची संख्या १४०३ इतकी झालेली आहे.
दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये सर्वाधीत कोरोना बाधीत रूग्ण जळगाव शहरात ३३४ इतके आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-६७; जळगाव ग्रामीण ३०, भुसावळ-३८; तर रावेर २७ इतके पेशंट आढळून आले आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता; अमळनेर ११, पाचोरा २, भडगाव ३, धरणगाव १०, यावल ४, एरंडोल ३, जामनेर २, पारोळा १६, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २६, बोदवड १८, इतर जिल्ह्यातील रुग्ण ३ असे रूग्ण ६१० आढळून आले आहेत.