मुंबई : जळगाव येथील महिला वसतीगृहासंबंधी घटनेची सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.
गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, काल या महिला वसतीगृहाबाबत वृत्त प्रकाशित झाल्याने त्याचबरोबर विधानसभेत सदस्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर चौकशीसाठी नेमलेल्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या वसतीगृहातील महिलांशी चर्चा केली. 41 साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या वसतीगृहात 17 महिला वास्तव्यास असून त्यांच्यासोबत महिला अधिकाऱ्यांनी चर्चा केली. महिला वसतीगृह असल्याने पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. तक्रारदार महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही, असा अहवाल या महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, या वसतीगृहात पिडीत आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारित करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील या घटनेत तथ्य नसल्याचे यावेळी सांगितले.